अहंकार कधी, कुठे आणि कशा पद्धतीने आपलं डोकं वर काढतो ते मला खरंच कळत नाही. मला नेहमी असंच वाटतं की आपण किती योग्य वागतो. गोष्ट इथेच थांबत नाही, तर त्यापुढे जाऊन असंही वाटतं की बाकीचे सगळे कसे अयोग्य वागतात! काय गंमत आहे!
मी यावर सिंहावलोकन करायचं ठरवलं. आणि माझ्या लक्षात आलं की मी यामुळे माझ्या बायकोशी, आईशी, बाबांशी आणि असंख्य जणांशी या तोऱ्यात आतापर्यंत किती वाईट वागलो आहे. वेळ कदाचित निघूनही गेली असेल आता. पण एक गोष्ट मी अनुभवली ती म्हणजे या सिंहावलोकनामुळे माझा अहंकार थोडा का होईना कमी व्हायला मदत झाली. परिणाम चांगलाच आहे. पण त्याची किती किंमत मोजावी लागते हे समजल्यावर डोळ्यात पाणी नाही आलं तरंच नवल!
आपला अहंकार मारण्यासाठी आपल्या माणसांना आणि इतर लोकांना सुद्धा किती दुःख झेलावं लागतं! काहीबाही ऐकून घ्यावं लागतं. जुळवून घ्यावं लागतं. मी हे सुद्धा अनुभवलं आहे कि कधी कधी त्यांना बोलावं वाटलं तरी गप्प बसून राहावं लागतं. याची कारणं बरीच आहेत. बायको असल्यामुळे व नोकरी करत नसल्यामुळे थोडी माघार घ्यावी लागते. आई बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वय साथ देत नसतं. कारण राज्य आता मुलाचं झालेलं असतं.
आणि मला मात्र असं वाटतंच राहतं की वाह! कसं गप्प केलं मी सगळ्यांना. काय तो विजय मिळवल्याचा आनंद! इतका क्षणिक असून सुद्धा किती खोल जखम करणारा आहे इतरांच्या मनात. वयाची ३८ वर्ष पूर्ण झाली ही अक्कल यायला. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं.
मी किती दुष्ट आहे हे तेव्हा कळलं जेव्हा घरात माझ्याशी वाद घालायला किंवा माझी चूक मला दाखवायला पण माझी माणसं किती घाबरतात हे उमगलं. हे भयावह वातावरण कोणी निर्माण केलं? माझ्या अहंकाराने.
मला असं वाटतं कि एका बाजूला जसा क्षमाशीलता हा गुण समोरचा किती थोर आहे हे दाखवून देतो त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला पश्चात्ताप हा गुण मी किती लहान, वाईट आणि पापी आहे हे दाखवून देतो.
म्हणूनच जिथे शंकराचार्यांसारखा महान आत्मा सुद्धा म्हणतो,
भवाब्धावपारे महादुःखभीरु
पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः ।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||
कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धिः कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः ।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||
तिथे माझ्यासारख्या तुच्छ दुष्टाची काय कथा?
आणि म्हणूनच शेवटी संत मोरया गोसावी, संत तुकाराम आणि आदि शंकराचार्य यांनी जशी कबुली दिली आणि प्रार्थना केली तीच मी सुद्धा श्रीस्वामी चरणी करतो.
मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करु काय जाणे । अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तु घाल पोटी ॥
कोण्या तरी योगें तुझा छंद लागो । मन माझें जागो भजनीं तुझ्या ॥१॥
कोण्या तरी योगें पश्चात्ताप घडो । चित्त हें मुरडे स्वरुपीं तुझ्या ॥२॥
कोण्या तरी योगें घडो संतसेवा । येवो अनुभवा निज सुख ॥३॥
तुका ह्मणे ऐसा योग कोण वेळ । राहेन निश्चळ तुजपासी ॥४॥
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥
